पारस वीज केंद्राला कार्यक्षम पाणी वापराबद्दल राष्ट्रीय पुरस्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

११ मे २०१९

पारस वीज केंद्राला कार्यक्षम पाणी वापराबद्दल राष्ट्रीय पुरस्कार

पारस (अकोला):

पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व लक्षात घेऊन वीज उत्पादन प्रक्रियेत जल संवर्धन विषयक जाणीवेतून काटकसरीने पाणी वापर, पाण्याचा पुनर्वापर,शून्य पाणी निचरा इत्यादीची प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्याने नुकतेच अकोला जिल्ह्यातील महानिर्मितीच्या  महत्वाकांक्षी २x२५० मेगावाट स्थापित क्षमतेच्या पारस औष्णिक विद्युत केंद्राला "राष्ट्रीय पुरस्कार" मिळाला आहे. 

नुकतेच मिशन एनर्जी फाउंडेशन या संस्थेच्यावतीने "जलसंवर्धन २०१९" या परिषदेत ताज व्हिवांटा द्वारका नवी दिल्ली येथे हा पुरस्कार भारत सरकारचे माजी ऊर्जा सचिव अनिल राजदान आणि मिशन एनर्जी फाउंडेशनचे संचालक अश्विनकुमार खत्री यांचे शुभहस्ते हा पुरस्कार पारस वीज केंद्राचे कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ कान्होबा तुपसागर यांना प्रदान करण्यात आला. या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे पारस औष्णिक विद्युत केंद्रात उत्साहाचे व आनंददायक वातावरण निर्माण झालेले आहे.


सदर पुरस्कार लक्षणीय आहे कारण या संबंधीची आकडेवारी परस्पर केंद्रीय विद्युत प्राधिकरण यांचेकडून घेण्यात आलेली आहे व मान्यवर परीक्षकांच्या शिफारशीनुसार या उल्लेखनीय कामाची निवड करण्यात आलेली आहे. देशभरातील बहुतांश सार्वजनिक, शासकीय व खाजगी वीज केंद्रांचा या स्पर्धेमध्ये सहभाग होता. विशेषत: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनसारख्या अग्रमानांकित संस्थेचा यामध्ये सहभाग होता. 

पारस औष्णिक विद्युत केंद्राने पाणी वापर शासकीय निकष ३.५ लिटर प्रति युनिट असतांना मागील दोन वर्षात सूक्ष्म नियोजन करून सन २०१६-१७ (३.०७), २०१७-१८ (२.९३) आणि २०१८-१९ (२.५६) लिटर प्रति युनिट अशी सातत्याने पाणी काटकसर केलेली आहे. पाण्याचा पुनर्वापर केल्याने हि किमया साधता आली. विशेष म्हणजे, राख वाहून नेणारे पाणी, वसाहतीमधील सांडपाणी, वीज उत्पादन प्रक्रियेनंतर बाहेर निघणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून, त्या पाण्याचा पुनर्वापर करण्यात आला व त्यामूळे पारस वीज केंद्राला कार्यक्षम पाणी वापर वीज केंद्र या संवर्गात राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.


पारस वीज केंद्राचे मुख्य अभियंता डॉ.रवींद्र गोहणे यांनी महानिर्मिती वरिष्ठ व्यवस्थापनाचे आणि संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल त्यांचे  विशेष आभार मानले आहे. सोबतच पारस वीज केंद्राचे अधिकारी-विभाग प्रमुख-अभियंता-तंत्रज्ञ-कर्मचारी व रहिवाश्यांनी पाणी बचतीसाठी व पुनर्वापरासाठी घेतलेल्या परिश्रमाचे हे फलित असल्याचे डॉ.रवींद्र गोहणे यांनी सांगितले.

मुख्य अभियंता डॉ. रविंद्र गोहणे, उप मुख्य अभियंता मनोहर मसराम, अधिक्षक अभियंता रूपेन्द्र गोरे यांनी सर्व अधिकारी, विभाग प्रमुख,अभियंता, तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.