फसवणूक टाळायची असेल तर वीज ग्राहकांनी वीजबील भरल्याच्या अधिकृत पावत्या घ्याव्यात:महावितरण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ मे २०१९

फसवणूक टाळायची असेल तर वीज ग्राहकांनी वीजबील भरल्याच्या अधिकृत पावत्या घ्याव्यात:महावितरण

नागपूर/प्रतिनिधी:

वीजबिलाचा भरणा केल्यानंतर महावितरणकडून वीजग्राहकांना अधिकृत संगणकीकृत पावत्या देण्यात येतात. परंतु काही ठिकाणी अशा अधिकृत पावत्या न देता वीजबिलावर केवळ शिक्का मारून देण्यात येत असल्याचे निर्दशनास आले आहे. यामुळे संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी अधिकृत संगणकीकृत पावत्याच स्वीकाराव्यात तसेच अधिकृत पावत्या न देण्याचे प्रकार आढळून आल्यास ग्राहकांनी त्वरीत नजिकच्या महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणने आपल्या सर्व वीजबील भरणा केंद्रांत (पोस्ट ऑफीस सोडून) संगणकीय प्रणाली अंमलात आणली आहे. त्यामुळे ग्राहकांनी वापरलेल्या वीज देयकाचा भरणा अचूक व ग्राहकाच्या खात्यावर त्वरीत समायोजित होतो तसेच यामध्ये ग्राहकांना अधिकृत संगणकीकृत पावत्याही देण्यात येतात. परंतु काही ठिकाणी वीजदेयक भरल्याची अधिकृत संगणकीकृत पावती न देता केवळ वीजबिलांवर वीजबील भरल्याचा शिक्का देण्यात येत आहे यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. म्हणून वीज ग्राहकांनी महावितरणच्या कोणत्याही प्रकारच्या रक्कमेचा भरणा करताना अधिकृत पावतीचाच आग्रह धरावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

महावितरणने ग्राहकांच्या सोयीसाठी व ऑनलाईन वीजबील भरणा करण्यासाठी ग्राहकांना विविध पर्याय महावितरणचे संकेतस्थळ www.mahadiscom.in व महावितरणच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध करून दिले आहेत. तसेच ऑनलाईन भरणा करणाऱ्या ग्राहकांना बिलाच्या रकमेच्या ०.२५ टक्के सूट महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सूट ऑनलाईन भरणा केल्यावर पुढील बिलात समायोजित करण्यात येते. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी ऑनलाईन सुविधांचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.