नागपूरात नौकरी लावून देण्याच्या नावाखाली बेरोजगारांना ३४ लाखांचा गंडा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ मे २०१९

नागपूरात नौकरी लावून देण्याच्या नावाखाली बेरोजगारांना ३४ लाखांचा गंडा

नागपूर/प्रतिनिधी:
बेरोजगारांना गंडा साठी इमेज परिणाम
 नागपुरात वनविभागात वनसंरक्षक म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून १  नव्हे २ नव्हे तर तब्बल ७  बेरोजगारांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या साठी बेरोजगारांना ३४ लाखांनी फसवणूक केल्याप्रकरणी तहसील पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहेयात विनोद मोतीराम मोहोड, जस्मिता हितेश कोटांगळे आणि अनिल माधव सार्वे या तीन आरोपींचा समावेश आहे. यातील मुख्य आरोपी विनोद मोहोडला पोलिसांनी कारंजा घाडगे येथून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ब्रिजेश हेमराज खोब्रागडे (२८, रा. बेला, भंडारा) व इतर सुशिक्षित बेरोजगारांनी तहसील पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी विनोद मोतीराम मोहोड (४८, रा. गोपालनगर, नागपूर), जस्मिता हितेश कोटांगळे (३५, रा. गुलमोहर अपार्टमेंट, टेकानाका, नागपूर) आणि अनिल माधव सार्वे (४५, रा. करडी, भंडारा) यांनी संगनमत करून त्यांना वनविभागात वनसंरक्षक ही शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी आरोपींनी २६ ऑक्टोबर २०१६ रोजी तहसील पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मेयो हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये फिर्यादीची भेट घेतली. त्यासाठी साडेसात लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगून पूर्ण पैसे घेतले. त्याचबरोबर आरोपींनी इतरही ७ बेरोजगार तरुणांकडून ३४ लाख रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी व इतर बेरोजगार युवकांनी आरोपींना वारंवार कॉल करून पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. यावर आरोपींनी वनविभाग, नागपूर या कार्यालयाचे बनावट स्टॅम्प तयार केले आणि वनसंरक्षक या पदाचे बनावट नियुक्तिपत्र तयार करून ते फिर्यादी व इतर युवकांना पाठविले. त्यानुसार फिर्यादी आणि सहकारी युवक नागपूरच्या वनविभागाच्या कार्यालयात गेले असता त्यांना हे नियुक्तिपत्र खोटे असल्याचे सांगण्यात आले.

 यात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.  या तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी अप.क्र 237/2019 कलम 420,
406, 467, 468, 471, 472, 473, 474, 475, 34 भादवि अंतर्गत  गुन्हा दाखल केला असून  तपास आर्थीक
गुन्हे शाखा, नागपूर शहर मार्फत सुरू आहे.

 दरम्यान, वनविभागात वनरक्षक व कनिष्ठ लिपिकपदी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून या आरोपींनी कुणाकडून पैसे घेतले असल्यास त्यांनी त्वरित कार्यालय पोलीस उपायुक्‍त, आर्थिक गुन्हे शाखा, प्रशासकीय इमारत क्र. १, ४ था माळा, सिव्हिल लाइन्स, नागपूर शहर येथे पोलीस उपनिरीक्षक स्नेहल राऊत यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.