23 मे च्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ एप्रिल २०१९

23 मे च्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज


मतमोजनी केंद्रावर प्रवेश मर्यादीत व राखीव


चंद्रपूर दि 29 एप्रिल: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी येत्या 23 मेला होणार असून मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चंद्रपूरचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत सूचना प्रकाशित करण्यात आलेली आहे. वखार महामंडळाच्या परिसरात ही मतमोजणी होणार असून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

सदर सूचना पत्रात निर्देशित केल्याप्रमाणे प्रत्येक विधानसभा मतदार क्षेत्रात नेमून दिलेल्या मतमोजणी हॉलमध्ये 14 टेबल राहणार आहेत. प्रत्येक टेबलसाठी राजपत्रित दर्जाचे एक मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहाय्यक राहणार आहे. तसेच मतमोजणी सूक्ष्म निरीक्षणासाठी, मतमोजणी प्रक्रियेची शुद्धता तपासण्यासाठी व मतमोजणीची नोंद घेऊन ते निवडणूक निरीक्षक कडे सुपूर्द करण्यासाठी एक मतमोजणी सहाय्यक नियुक्त केला जाणार आहे. तसेच प्रत्येक मतमोजणी हॉल करीता दोन अतिरिक्त सूक्ष्म निरीक्षक देण्यात येणार आहे. प्रत्येक फेरीतील किमान दोन कंट्रोल युनिटची रँडम तपासणी आयोगाचे निरीक्षक चाचणी पद्धतीने करू शकतात व निकाल अचूक असल्याबाबत पर्यवेक्षकाने भरलेल्या नमुना 17 सी भाग 2 च्या आकडेवारीशी तपासून अचूक असल्याची खात्री करतील. प्रत्येक फेरीचे निकालपत्र निवडणूक निर्णय अधिकारी सोबत तपासून सहनिशा करून घेतील. जेणेकरून पुढे कोणत्याही पुनर्मोजणी साठी वाव राहणार नाही व वेळोवेळी पारदर्शक पारदर्शकता ठेवण्यात येईल.

दिनांक 23 मे 2019 रोजी केंद्रीय निवडणूक निरीक्षकांच्या समोर सकाळी पाच वाजता मतमोजणी कर्मचाऱ्याचे एन आय सी येथे सरमिसळ करण्यात येईल व त्याद्वारे प्रत्येक पर्यवेक्षक व सहाय्यकाला विशिष्ट मतदार संघ मतमोजणी टेबलवर व त्या अंतर्गत नेमणूक दिल्या जाईल. सकाळी 6.00 वाजता नियुक्त आदेश प्राप्त करून घेतल्यानंतर ते नेमून दिलेल्या मतमोजणी हॉलमध्ये मतगणनासाठी सकाळी सात वाजता हजर राहतील. दिनांक 23 मे 2019 रोजी सकाळी 7.00 वाजता उपस्थित असलेले उमेदवार किंवा त्यांची निवडणूक प्रतिनिधी समोर ईव्हीएमचे सीलबंद स्ट्राँग रूम उघडण्यात येईल. सकाळी ठीक 8.00 वाजता लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 128 चे संविधानिक तरतुदीचे वाचन केल्यानंतर लगेच टपाली मतपत्रिका ची गणना सुरू होईल व त्यापाठोपाठ विधानसभा मतदारसंघनिहाय द्वारे मतगणना सुरू होईल असे सूचना पत्रात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत नमूद करण्यात आलेले आहे.

सोबतच मतमोजणी करिता निवडणूक लढवणारे उमेदवाराचे प्रतिनिधींना त्यांचे फोटो सहित ओळखपत्र व नमुना 8 मध्ये नेमणुकीसंदर्भात नियुक्त पत्राच्या साक्षांकित प्रति दाखवल्याशिवाय मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.यासंबंधीचे पत्रक जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत प्रकाशित करण्यात आलेली आहे.

तसेच उमेदवार किंवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांचे सुरक्षा कर्मचारी यांना प्रवेश दिला जाणार नाही. फक्त मतमोजणीशी संबंधित कर्मचारी, निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले व्यक्ती, निवडणूक कार्यवाहीशी संबंधित असलेले लोकसेवक, उमेदवार यांचे मतमोजणी प्रतिनिधी यांना प्रवेश दिला जाईल. मतमोजणीत केंद्रात प्रवेश करताना उमेदवार व त्यांचे निवडणूक प्रतिनिधी आणि मतमोजणी प्रतिनिधी तसेच मतमोजणीच्या कामाकरता नियुक्त अधिकारी तथा कर्मचारी यांना मोबाईल फोन तसेच कॅमेरा इत्यादी साहित्य मतमोजणी केंद्रात प्रवेश करतेवेळी सोबत घेऊन जाण्यास भारतीय निवडणूक आयोगाने प्रतिबंध केलेले आहे. तरी मतमोजणी केंद्रात प्रवेश करतेवेळी मोबाईल फोन तसेच कॅमेरा सोबत आणू नये अशा सूचना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या आहे.