1 मे ला निघणार इको-प्रोची वारसा संवर्धन परिक्रमा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० एप्रिल २०१९

1 मे ला निघणार इको-प्रोची वारसा संवर्धन परिक्रमा

संपुर्ण महाराष्ट्रात पोहचणार गडकिल्ले आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश
चंद्रपुर/ प्रतिनिधी:

चंद्रपूरातील ऐतिहासिक गोंडकालिन किल्ल्याची सलग सातशे दिवस स्वच्छता केल्यानंतर इको-प्रोच्या कार्यकर्त्यानी आपला वारसा, आपणच जपूया असा नारा देत संपूर्ण राज्यात ऐतिहासिक वारसा आणि वन्यजीवासह निसर्गाच्या संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वारसा संवर्धन परिक्रमा १ मेपासून आयोजित करण्यात आली आहे. एक मे रोजी चंद्रपूर येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दिल्यनंतर ही परिक्रमा मूल मार्गे गडचिरोलीहून वैरागड (ता़ आरमोरी), नवेगाव बांध, पवनी (जि़ भंडारा) येथून उमरेड येथे दाखल होईल़ त्यानंतर नागपूर येथे २ मे रोजी कार्यक्रम होणार आहे़ इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात सुमारे २५ कार्यकर्ते दुचाकी आणि रथासह महाराष्ट्रभर २० मेपर्यंत भ्रमंती करणार आहेत़ 

चंद्रपूरला ऐतिहासिक गड-किल्यांचा, स्मारकांचा समृध्द वारसा आहे. याशिवाय ताडोबाच्या निमित्ताने वन्यजीव आणि निसर्गाची समृध्दीही चंद्रपूरला लाभलेली आहे. त्यांच्या संवर्धनासाठी इको-प्रो संस्था एक दशकाहून अधिक काळापासून कार्यरत आहेत़ राज्यातील अनेक ठिकाणचा ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित असून, त्याचे जतन आणि संवर्धन गरजेचे आह़े नैसर्गीक वारसा असलेले अभयारण्य, व्याघ्र प्रकल्पे, वन-वन्यजीव यांचा अधिवास अनेक कारणामुळे प्रभावीत होत आहेत. वाढत्या मानव-वन्यजीव संघषार्मुळे वन्यप्राणी संवर्धनाची चळवळ संकटात आलेली आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यासाठी सर्व पातळीवर जागृती गरजेची आहे. या दोन्ही प्रकारच्या वारसा संवर्धन जनजागृतीच्या दृष्टीने ही परिक्रमा मैलाचा दगड ठरणार आहे.
या परिक्रमेत इको-प्रो संस्थेचे २५ युवक आपल्या दुचाकीसह स्वंयप्रेरणेने भाग घेत असून, सुमारे पाच हजार किमीचे राज्यभ्रमण करणार आहेत. 

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन संबधित जिल्ह्याातील ऐतिहासिक वारसा व वन-वन्यजीव नैसर्गीक वारसा संदर्भातील समस्यांचा आढावा घेत त्याच्या निवारणासाठी उचित आराखडा बनविण्यासाठी जिल्हास्तरावर स्थानिक तसेच विशेषज्ञ यांचा बैठकाही घेण्यात येतील. या माध्यमातून राज्यभर विणलेल्या जाळ्यातून संपुर्ण राज्यातील या क्षेत्राच्या समस्या निवारण्यासाठी उपयोग करण्यात येणार असल्याचा विश्वास बंडू धोतरे यांनी व्यक्त केला आहे.