तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार

१५ फेब्रुवारी रोजी पुण्यात वितरणढोलकीफड तमाशा महोत्सवाचे आयोजन

मुंबई, दि. ६ : राज्य शासनातर्फे दरवर्षी देण्यात येणारा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लोकशाहीर बशीर कमरोद्दीन मोमीन (कवठेकर) यांना जाहीर झाला असून, १५ फेब्रुवारी रोजी पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

तमाशा क्षेत्रात विठाबाई नारायणगावकर यांनी केलेली प्रदीर्घ सेवा विचारात घेता त्यांच्या नावे तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास राज्य सरकारतर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. महाराष्ट्र शासनातर्फे सन २००५ पासून तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार विविध कलाकारांना प्रदान करण्यात आला आहे.

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार यंदा लोकशाहीर बशीर कमरोद्दीन मोमीन (कवठेकर) यांना घोषित करण्यात आला आहे. गतवर्षीचे पुरस्कार विजेते ज्येष्ठ कलाकार मधुकर नेराळे यांच्या हस्ते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रुपये ५ लाख, मानपत्र व सन्मानचिन्ह असे आहे.

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे औचित्य साधून राज्य शासनाच्यावतीने पाच दिवसाच्या ढोलकीफड तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ढोलकीफड तमाशा महोत्सव १४ ते १८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत वाघोली बाजारतळ तालुका हवेली जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

ढोलकीफड तमाशा महोत्सवात दरदिवशी एका लोकनाट्य मंडळाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. गुरुवार दि. १४ फेब्रुवारी रोजी हरिभाऊ बडे नगरकर सह शिवकन्या बडे नगरकर लोकनाट्य तमाशा मंडळ, शुक्रवार दि. १५ फेब्रुवारी रोजी भिका भीमा सांगवीकर लोकनाट्य तमाशा मंडळ, शनिवार दि. १६ फेब्रुवारी रोजी रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ, रविवार १७ फेब्रुवारी रोजी सौ. मालती इनामदार नारायणगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ, सोमवार दि. १८ फेब्रुवारी रोजी श्रीमती मंगला बनसोडे करवडीकर सह नितीन बनसोडे करवडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ हि लोकनाट्य मंडळे ढोलकीफड तमाशा महोत्सवात आपली कला सादर करणार आहेत.

तरी रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवाचा भरभरून आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक यांनी केले आहे.