अवैध सावकारांविरुद्व फास - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

अवैध सावकारांविरुद्व फास


चंद्रपूर, बल्लारपूर व चिमूर तालुक्यात एकाचवेळी सहकार विभागामार्फत कारवाई

चंद्रपूर, दि.30 जानेवारी- चंदपूर जिल्हयातील चंद्रपूर, बल्लारपूर व चिमूर तालुक्यात सहकारी विभागामार्फत 30 जानेवारी रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर यांचेकडे अवैध सावकारी संदर्भाने प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सकाळी 8 ते 9.00 या दरम्यान अवैध सावकाराचे घरावर व इतर मालमत्तेवर टाकलेल्या धाडीत मोठया प्रमाणात आक्षेपार्ह साहित्य आढळून आले. या आक्षेपार्ह दस्ताऐवजावरुन तीनही संशयीत अवैध सावकारांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिंबधक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

चंद्रपूर तालुक्यातील चंद्रपूर शहरातील जटपूरा गेट जवळील शुभम अनिल लोणकर रा.जटपूर गेट वार्ड क्रं.1 रामनगर रोड चंद्रपूर यांचे राहते घरी स्वाक्षरी असलेला 1 कोरा स्टॅम्प पेपर, स्वाक्षरी नसलेले 3 कोरे स्टॅम्प पेपर, स्वाक्षरी असलेले परंतू रक्कम नमूद नसलेले 7 कोरे चेक व रक्कम असलेला 1 चेक तसेच संशयास्पद नोंदी असलेल्या 23 पॉकीट डायरी आढळल्या.

बल्लारपूर तालुक्यातील बामणी कु. पुष्पा श्रावण जाधव, रा. बेघर रोड बामणी ता.बल्लारपूर जि.चंद्रपूर येथील आज रोजी टाकलेल्याधाडीत पुष्पा श्रावण जाधव यांचे नावाने दुसऱ्याचे सही व रक्कम नमूद असलेले 7 चेक, प्रभाकर कुंभारे यांनी लिहून दिलेला उतारा आढळलेलाआहे.

चिमूर तालुक्‍यातील नेरी येथील गुलाब नारायण कामडी यांच्याकडे टाकलेल्या धाडीत मालमत्ता स्थावर 4 विक्रीपत्र आढळून आले. दत्तु भगवानजी पिसे, मु.पो.नेरी यांचे राहते घरी स्वाक्षरी असलेले 3 कोरे चेक व स्वाक्षरी नसलेले 6 कोरे चेक, तीन 7/12, 2100 रुपयाचे कोरे स्टॅम्प पेपर, 1 इसारपत्र व आक्षपार्ह नोंदी असलेले वही व डायरी आढळल्या.

अवैध सावकारी संबंधाने प्राप्त तक्रारीवर जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांचे मार्गदर्शनात असलेल्या सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर , बल्लारपूर व चिमूर तालुक्यातील अनुक्रमे पी. एस. धोटे, एम. डी. मेश्राम, आर. एन. पोथारे व पी. एन. गौरकार यांचे नेतृत्वात 4पथकामार्फत चंद्रपूर ,बल्लारपूर व चिमूर तालुक्यामध्ये अवैध सावकार अनुक्रमे शुभम अनिल लोणकर, कु . पुष्पा श्रावण जाधव व गुलाब नारायण कामडी, दत्तु भगवानजी पिसे यांचे घर व प्रतिष्ठाणावर धाडी टाकण्यात आल्या. त्यावेळी त्यांचेकडून अवैध सावकारीचे अनुषंगाने वरिलप्रमाणे दस्ताऐवज जप्त करण्यात आलेले आहे. जिल्हयातील एकूण 3 तालुक्यात विविध पथकाव्दारे 35 कर्मचाऱ्यांनी सकाळी 8.25वाजेपासून दुपारी 12.30 वाजपेर्यंत केलेल्या धाडसत्रात वरिलप्रमाणे दस्तऐवज व इतर कागदपत्रे हस्तगत करण्यात आले आहेत.

सदर धाडीत पोलीस विभागातील 8 कर्मचारी विजय जाधव , सिमा आत्राम, प्रिती महाजन, पो. सी. बंडू मातने तसेच चिमूर येथील पोलीसकर्मचारी व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,चंद्रपूर तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर /बल्लारपूर व चिमूर येथील अधिकारी पी. एस. धोटे, एम.डी. मेश्राम, स.नि.बल्लारपूर व आर. एन. पोथारे सनि, चिमूर व कर्मचारी आर. डी. कुमरे, आर, आर.कोमावार, एस.डी. शेळकी, पी. डब्ल्यु, भोयर, एम. पी.पिंगे, एस. एस.बोधे, एस.बी. एवले., पी. एन. गौरकार, ए. एस. देरकर, व्ही .आर. निवाने तसेच गटसचिव व पतसंस्थेतील मॅनेजर व कर्मचारी यांनी पंच म्हणून सहभाग घेतला.

महाराष्ट्र सहकारी (नियमन) अधिनियम 2014चे कलम 16नुसार सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर ,बल्लारपूर व चिमूर यांचे मार्फत उपरोक्त प्रकरणाबाबत पुढील तपास सुरु असून तपासाअंती अवैध सावकारांचे विरुध्द योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. अवैध सावकारीबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास संबंधित तालुक्याचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था अथवा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर यांचे कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन,जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,चंद्रपूरचे ज्ञानेश्वर खाडे यांनी केले आहे.